Pages

Monday, 25 November 2013

हर एक फ्रेंड जरुरी होता है

कामाच्या ठिकाणी, कॉलेजमध्ये किंवा एखाद्या नात्यातल्या गोंधळाबाबत तुम्ही तिच्याशी केव्हाही जाऊन मन मोकळं करू शकता. ती तुमच्याकडे जराही समीक्षक दृष्टीनं न पाहाता तुम्हाला अत्यंत प्रॅक्टिकल सल्ले देते. ती तुमची खरी कौन्सेलर मैत्रीण असते. तिच्याशी तुम्ही जगातल्या काय पण गोष्टी बोलू शकता. ज्या वेळी तुमच्याकडे कुणी लक्ष देण्याची आवश्यकता असते, त्या प्रत्येक वेळी ती असते. 

पक्की सखी 


तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक चढ-उतारादरम्यान तिनं तुम्हाला साथ दिली आहे. तुमचे सगळे मूड झेलले आहेत. ती तुम्हाला खूप जवळून आणि चांगलं ओळखते. तुम्ही तिच्याशी प्रचंड भांडणं केली आहेत, विविध मुद्द्यांवर वाद घातले आहेत; तरीही तुम्ही एकमेकींना सोडू शकत नाही. कारण तुमचं एकमेकींवर प्रचंड प्रेम आहे. 

धमाल मैत्रीण 

तुम्हाला ज्या क्षणी वेडपणा करावासा वाटलाय, जेव्हा तुम्ही बालिशपणा केलाय, त्या प्रत्येक वेळी ती तुमच्याबरोबर होती. तिच्याशिवाय त्या वेडसर कृतीलाही मजा आली नसती. जगात कुठे, काय भन्नाट घडतंय, याची तिला खडान् खडा माहिती असते. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही सहभागी व्हालच आणि तिच्याबरोबरच तिच्याइतकीच धमाल कराल, याचीही जबाबदारी तीच घेते. तिच्याबरोबर गप्पा मारण्यात रात्र कधी गेली, हे कळत नाही. 

प्रामाणिक ती 

ती कधीही फक्त तुम्हाला चांगलं वाटेल म्हणून कौतुक करणार नाही किंवा तुमच्याविषयी वाईटात वाईट गोष्टही तुमच्या तोंडावर सांगायला घाबरणार नाही. ती तुमची खरी प्रामाणिक मैत्रीण असेल, जी तुम्ही कितीही चिडलात, तरी तिच्या मतावर ठाम असेल. 

काळजीवाहू 

तुम्हाला थोडं जरी कसंतरी व्हायला लागलं, तरी ती तुम्हाला लगेच पाणी आणून देते. खुर्चीवर शांत बसायला लावते. तुमच्यासाठी उत्तम खायला करून देते आणि तुमची सर्व तऱ्हेनं काळजी घेते. आई किंवा मोठ्या बहिणीच्या मायेनं तुमचं करणारी ही प्रेमळ मैत्रीण असते. 

1 comment: